SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label गुरुपौर्णिमा. Show all posts
Showing posts with label गुरुपौर्णिमा. Show all posts

Thursday, March 21, 2024

गुरुपौर्णिमा

   ⚜️ गुरुपौर्णिमा ⚜️

              आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याऐवजी श्रेष्ठ गुरूजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन आहे. 'व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम्' असे त्यांच्यासंबंधी लिहिले गेले आहे. एवढेच नव्हे तर महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहार शास्त्र, मानसशास्त्र आहे, अशा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्यांना मानतात, त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.

              व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ॐ नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे' अशी प्रर्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभरत काळापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण उद्धार करीत असतो. आशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य होय. महर्षि व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आज-मितीपर्यंत.

                आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरू-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञवल्क्य, शुक्राचार्य- जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरू-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरूनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

                गुरुपौर्णिमा ही सद्‌गुरूची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरू शिष्याला ज्ञान देतात. ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचवतात, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. गुरू म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरू बिन ज्ञान कहाँसे लाऊँ ?' हेच खरे.

               गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो.

गुरुर्ब्रहमा गुरुर्विष्णुः

 गुरुर्देवो महेश्वरः।।

 गुरुः साक्षात् परब्रह्म

 तस्मै श्री गुरवे नमः ।।

अशा या विविध सणांमुळेच भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे.  

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.