प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबविण्याबाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना |
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबविण्याबाबत.
संदर्भ :- १. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि. १३.०२.२०१५. २. मा. अपर सचिव, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे निर्देश दि. २६.०६.२०२४.
शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीत वाढ व कुपोषण मुक्तता करण्यासाठी राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी योजनेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. योजनेत वैविधता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविणे आवश्यक आहे.
भारत सरकारच्या "१०० दिवसांच्या कार्यक्रमाचा" एक भाग म्हणून स्नेह भोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. नियमित मध्यान्ह भोजना व्यतिरिक्त स्नेहभोजनातील लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या वाढीस उपयोगी असणारी पूरक पोषण मूल्ये प्राप्त होतील. आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्न पदार्थाची चव चाखता येईल, तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत लोकसहभाग वाढविण्यासाठी "स्नेहभोजन" उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.
१. नवीन शैक्षणिक वर्षातील पुढील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये किमान एक दिवस शाळेमध्ये स्नेह भोजन उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी.
२. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरविण्यासाठी "स्नेहभोजन" हा उपक्रम राबविण्यात यावा, सदर उपक्रम "ऐच्छिक" स्वरूपाचा राहील.
३. शाळास्तरावर "स्नेहभोजन" उपक्रमाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी.
1. गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जन्म शताब्दी इ. तसेच, लग्न समारंभ, धार्मीक सप्ताह, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण इ. बाबी या उपक्रमातंर्गत विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट राहतील.
ii)योजनेस पात्र सर्व शाळामधून " स्नेहभोजन" उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस राहतील, त्यासाठी ग्रामसभा, शालेय व्यवस्थापन समितीची सभा, पालक सभेद्वारा जनजागृती करण्यात यावी, तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कर्मचारी अधिकारी तसेच सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनाही सदर प्रक्रियेबाबत अवगत करुन त्यांना सदर प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घ्यावे.
ii) शालेय पोषण आहारासोबत मिठाई, जेवण किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे) फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टांन्न) इत्यादीचा समावेश असलेले अन्न / आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा.
iv) "स्नेहभोजन" उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन देण्यात यावे व भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करणार आहे याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तिनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा.
v) "स्नेहभोजन" उपक्रमाअंतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्य पदार्थ किंवा आवश्यक इतर साहित्य (पाणी पिण्याचे पिंप, पाण्याचे ग्लास, ताटे, चमचे, डिश, मुलांना बसण्यासाठी चटई अथवा सतरंजी, पाण्याची टाकी, पाणी शुध्दीकरण यंत्र इ.) देता येतील.
vi) खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ/गहू/नाचणी, शेवगा शेंग/डाळी सोबत हिरव्या पालेभाज्या दिल्या जाव्यात. बाजारातील वेष्टनबध्द पदार्थ (जंक फूड) तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
vii) खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे.
viii) खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच तसेच, मध्यान्ह भोजनाच्या वेळेतच देण्यात यावेत.
यामध्ये वितरकाने जेवण दिल्यास त्या दिवशी शालेय पोषण आहार शिजविण्यात येवू नये. तथापि, केवळ अल्पोपहार / पूरक आहार दिल्यास त्या दिवशी शाळेमध्ये शालेय पोषण आहार ix) देणे आवश्यक राहील.
x) सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरकाने घेणे आवश्यक आहे. यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वितरकाची राहील.
xi) "स्नेहभोजन" उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
xii) शालेय पोषण आहार ही विदयार्थी केंद्रीत योजना असून अतिशय संवेदनशील असल्यामुळे सदर उपक्रम राबविताना दक्षता घेणे आवश्यक आहे. वितरक / समूहास याची कल्पना देणे आवश्यक आहे.
४. "स्नेहभोजन" उपक्रमास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर सभा व बैठकीमध्ये प्रसिध्दी देण्यात यावी. दैनिक वृत्तपत्रातून व प्रसार माध्यमातून याबाबत प्रचार करुन सामाजिक बांधिलकी व समाजाचा सहभाग वाढविण्याबाबत प्रचार करण्यात यावा. ग्राम सभा / पालक सभा / स्थानिक पातळीवरील सण, समारंभ (हळदी कंकु / गणेशोत्सव / नवरात्र / दहीहंडी) मधुन सदर योजनेस प्रसिध्दी देवुन लोकसहभाग वाढविण्यात यावा.
५. नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून वरील प्रमाणे सर्व शाळांमधून स्नेहभोजन योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल याकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात यावे.
६. जेथे "स्नेहभोजन" उपक्रम राबविला जाईल तेथील क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी या पत्रासोबत जोडलेल्या (परिशिष्ट-अ) मध्ये सदर उपक्रमाबाबतची माहिती तालुक्यांमार्फत संकलित करुन जिल्ह्याची एकत्रित माहिती संचालनालयास प्रत्येक महिन्यानंतर सादर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदर परिपत्रकाची PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.