⚜️ नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती ⚜️
सुभाषचंद्र बोस यांचे मूळचे घराणे बंगालमधील; परंतु त्यांचे वडील वकिली करण्यासाठी ओरिसातील कटक या गावी सहकुटुंब रहात होते. कटक गावी सुभाषबाबूंचा जन्म 27 जानेवारी 1897 रोजी झाला. वडिलांचे नाव जानकीनाथ व प्रभावती हे त्यांच्या आईचे नाव माता प्रभावतीदेवींनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. सद्गुरूंच्या शोधार्थ ते हिमालयात हिंडले; परंतु त्यांना सद्गुरू न भेटल्याने ते परत आले.
तो ब्रिटिश साम्राज्याचा काळ होता. ब्रिटिश सरकार करत असलेल्या अन्यायाच्या बातम्या ऐकून सुभाषबाबूंचे हृदय वेदनांनी हेलावून जात होते. १९१३ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे बी.ए. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कॉलेजच्या यू.टी.सी. पथकामध्ये प्रवेश करून सैनिकी शिक्षणाला प्रारंभ केला. वडिलांच्या इच्छेप्रमाणे आय.सी.एस. होण्यासाठी ते इंग्लंडला आले. एकाग्रतेने परिश्रमपूर्वक अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झाले व नंतर भारतात आले.
प्रारंभी त्यांनी महात्मा गांधी यांची भेट घेतली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते कलकत्त्याला आले आणि चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनानुसार देशसेवेला सुरुवात केली. कलकत्ता येथील नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही वर्षे कार्य केले. इंग्लंडचे युवराज कलकत्त्याला येणार होते, परंतु सुभाषबाबूंनी त्यांच्या स्वागतसमारंभावर बहिष्कार घातल्याने त्यांना सहा महिने कारावास भोगावा लागला. जालियनवाला बागेसारख्या क्रूर कत्तली पाहून सुभाषबाबूंचे हृदय पेटून उठले. ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. त्यांनी तरुणांना एकत्र करून संघटना उभारल्या.
१९३२ साली ते हरिपूर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तसेच १९३९ साली त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या प्रखर भाषणाने भारतीय समाज जागृत होऊ लागला होता. काही कारणांमुळे काँग्रेस पक्षातील नेत्यांशी वैचारिक मतभेद झाल्याने सुभाषबाबूंनी काँग्रेसचा राजीनामा दिला व स्वातंत्र्यव्रत अधिक प्रखर करण्यासाठी 'फॉरवर्ड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली.
२२ जून १९४० रोजी सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले. देशाच्या स्वातंत्र्याविषयी सावरकरांशी चर्चा झाली. सावरकरांनी त्यांना परदेशात जाऊन इटली व जर्मनी यांनी पकडलेल्या सैनिकांची मदत घ्यावी; ब्रिटिश सैन्यावर स्वारी करावी, असा सल्ला दिला.
२ जुलै १९४० मध्ये सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. त्या वेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला अन्नपाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करण्याची धमकी दिल्याने सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले. त् आजारपणाचे निमित्त करून दाढी वाढविली, मौलवीचा वेष परिधान केला व 'झियाउद्दीन पठाण' ने नाव धारण करून, ते कलकत्त्यातून बाहेर पडले व काबूल, जपानमार्गे जर्मनीला गेले. भारतीय सैनिक युद्धकैदी बनून हिटलर-मुसोलिनीच्या छावणीमध्ये अडकून बसले होते. सुभाषींनी त्यांची भेट घेऊन भारतीय स्वातंत्र्याचा विचार मांडला.
सुभाषबाबू सिंगापूरला आले आणि त्यांनी 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धात जपान सामील झाला आणि त्यांनी सुभाषबाबूंना मदत करण्याचे मान्य केले. बर्लिन रेडिओवरून भाषणात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आव्हान केले. ते म्हणाले, 'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो.' त्यांची ही घोषणा ऐकून सारा देश जागृत झाला. सैनिकांनी त्यांना नेताजी ही पदवी बहाल केली. 'चलो दिल्ली', 'जय हिंद' अशा घोषणा त्यांनी केल्या. भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने सुभाषचंद्र बोस यांनी 'इंडियन नॅशनल आर्मी' या संघटनेची स्थापना केली.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली व जपान यांचा पराभव झाल्याने त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. ते सायगावहून विमानाने निघाले; परंतु तैवान विमानतळावर विमानाचा अपघात होऊन त्यातच त्यांचा अंत 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला. अशा या थोर महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावरील सामान्य ज्ञान प्रश्न पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
नेताजीसुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावरील सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.