SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label यशवंतराव चव्हाण माहिती. Show all posts
Showing posts with label यशवंतराव चव्हाण माहिती. Show all posts

Thursday, March 7, 2024

यशवंतराव चव्हाण माहिती

 यशवंतराव चव्हाण माहिती


                   यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील 'देवराष्ट्रे' या गावी 12 मार्च 1913 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण त्यांनी कराड येथे घेतले. पुढील शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले. ते बी.ए. एल्.एल्.बी. झाले.

            १९३० साली म. गांधींनी सुरू केलेल्या ब्रिटिश सरकार विरोधी कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला; त्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली. कारावासात ते आपला बहुमूल्य वेळ वाचनात घालवीत होते. तुरुंगात असताना त्यांनी कार्लमार्क्स व मानवेंद्र रॉय यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. मानवेंद्र रॉय यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता.

             १९४२ साली म. गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरू केले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी भाग घेतला. सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या पत्री सरकारला त्यांनी भूमिगत राहून सहकार्य केले. पुढे ते पकडले गेले. त्यानंतर त्यांची सुटका झाली.

            १९४६ साली त्या वेळच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन त्यामध्ये ते निवडून आले. संसदीय चिटणीस बनले. १९५२ सालच्या निवडणुकीत निवडून येऊन ते मंत्री झाले व नोव्हेंबर १९५६ साली त्यांनी द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली.

जवाहरलाल नेहरू व इतर नेत्यांना भेटून महाराष्ट्राची बाजू मांडली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी पूर्ण करून घेतली. त्या राज्याचे तेच मुख्यमंत्री झाले. पुढे १९६२ ते १९६६ या काळी ते भारताचे संरक्षण मंत्री झाले. १९६६ ते ७० गृहमंत्री व १९७० ते ७४ ते परराष्ट्र मंत्री अशी विविध पदे भूषविली. पुढे ते उपप्रधानमंत्री होते.

             सर्वसामान्य जनतेचीही ते काळजी घेत होते. सर्वांशी ते आपुलकीने वागत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ यांसारख्या अनेक सांस्कृतिक व लोककल्याणकारी योजना अमलात आणल्या. मराठी विश्वकोषाच्या निर्मितीस त्यांचे सहकार्य लाभले.ते प्रभावी वक्ते होते. अनेक नवनवीन योजना ते मांडत असत. नवीन विचारांतून ते समाज प्रबोधन करत असत. सह्याद्रीचे वारे व युगांतर हे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ऋणानुबंध व कृष्णाकाठ हे आत्मचरित्र ही प्रसिद्ध आहे अशा या थोर महामानवाचा मृत्यू 25 नोव्हेंबर 1984 रोजी झाला त्यांची समाधी कराड येथे प्रीतीसंगम या ठिकाणी आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटनाक्रम.

⚜️ जन्म 12 मार्च 1913 देवराष्ट्र, सातारा (सध्या हे गाव सांगली जिल्हयात येते) येथे झाला.

⚜️ 1938 ला मुंबई विद्यापिठातून बी. ए. झाले.

⚜️ जवाहरलाल नेहरु, केशवराव जेधे, सरदार पटेल या नेत्यांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

⚜️ 1930 ला सविनय कायदेभंग आंदोलनात सहभाग घेतला.

⚜️ 26 जानेवारी 1932 ला सातारा येथे भारतीय ध्वज फडकविला म्हणून त्यांना 18 महिन्यांचा कारावास झाला.

⚜️ 1940 ला सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले.


⚜️ 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी अटक व शिक्षा झाली.

⚜️ 1944 ला कारागृहातून बाहेर आले.

⚜️ 1946 ला दक्षिण सातारा मतदारसंघातून मुंबई प्रांताच्या विधीमंडळ सदस्यपदी निवडून आले. आणि मुंबईराज्य गृहमंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून नेमणुक झाली.

⚜️ 1952 मध्ये परत मुंबई प्रांताच्या विधानसभेवर सदस्य म्हणून निवड व मंत्रीपदी नेमणूक.

⚜️ 1953 च्या नागपूर करारातील हस्ताक्षर कत्र्त्यांपैकी एक प्रमुख नेते होते.

⚜️ 1956 मध्ये महाराष्ट्र-गुजरात या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री बनले.

⚜️ संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी पं. नेहरू, गोविंद वल्लभपंत यांचे मन वळविले.

⚜️ 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासा- साठी त्यांनी प्रयत्न केले.

⚜️ त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात.

⚜️ 1962 मध्ये भारताचे संरक्षणमंत्री झाले.

⚜️ 1979 ला चरणसिंग सरकारमध्ये भारताचे उपपंतप्रधान झाले. यशवंतराव चव्हाण हे राजकारणी, उत्कृष्ट प्रशासक, साहित्यीक, कणखर नेता होते.

⚜️ लेखन - सहयाद्रीचे वारे, युगांतर, ऋणानुबंध, कृष्णाकाठ (आत्मचरित्र) निधन 25 नोव्हेंबर 1984 • समाधी - प्रीतीसंगम, कराड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ यशवंतराव चव्हाण यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खाली चित्राला टच करा.



यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील चाचणी सोडवण्यासाठी खालील चित्राला टच करा.



यशवंतराव चव्हाण भाषण