SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label लालबहादूर शास्त्री. Show all posts
Showing posts with label लालबहादूर शास्त्री. Show all posts

Friday, September 16, 2022

लालबहादूर शास्त्री

⚜️ लालबहादूर शास्त्री ⚜️



             लालबहादूर शास्त्री यांचा जन्म बनारस जवळील मोगलसराई या गावी 2 ऑक्टोबर 1904 साली झाला. वडिलांचे नाव शारदाप्रसाद आणि आईचे नाव रामदुलारी. यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव होते. वडील प्राथमिक शिक्षक होते. लालबहादूर दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर आकाश कोसळले. अत्यंत दुःखद परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले. शाळा नदीच्या पलीकडे होती. कधीकधी नदी पार करण्यासाठी नावाड्यास देण्यास त्यांच्याकडे पैसे नसायचे अशावेळी ते कपडे व दप्तर वर हातात धरून पोहत पोहत शाळेत जात. अभ्यास करत त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

                पुढे लालबहादूर काशीला गेले आणि त्यांनी तेथील विद्यापीठाची शास्त्री परीक्षा उत्तीर्ण केली. शास्त्रीजींचा ललिततादेवी यांच्याशी विवाह संपन्न झाला. दोघांची राहणीमान अत्यंत साधे होते. विचारसरणी उच्च होती. आपली कामे ते दोघी स्वतः करत असत. 

             1921 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकारिता आंदोलन सुरू केले. शास्त्रींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने ब्रिटिशांनी त्यांना अटक करून कारावासात पाठवले. प्रत्येक राष्ट्रीय चळवळीत ते भाग घेत होते. अस्पृश्यता हा देशाला लागलेला कलंक आहे. हे त्यांनी जाणले आणि हा कलंक पुसण्याचा त्यांनी आटोकाठ प्रयत्न केला. गांधीजी अस्पृश्यांना हरिजन मानत होते. सर्व माणसांत ईश्वर समान रूपात भरलेला आहे हे शास्त्रीजींनी जाणले. सर्वांना प्रगती करण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. असे लोकांना समजावून सांगत असत.

               शास्त्रींची स्वतः खरीद खादीचे कपडे वापरत असत. देश वासीयांनी खादीचे कपडे वापरावेत असे त्यांना वाटत होते. खादीचा प्रचार त्यांनी गावोगावी केला. काँग्रेसची संघटना वाढावी ,इंग्रजांविरुद्ध सर्व जनता जागृत व्हावी या दृष्टीने त्यांचे कार्य सातत्याने सुरू होते. 1942 साली भारत छोडो आंदोलनात त्यांनी भाग घेतला. अनेक वेळा तुरुंगवास सोसावा लागला परंतु त्यांनी आपले कार्य कधी बंद केले नाही.

             1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. पंडित नेहरू भारताचे पंतप्रधानमंत्री झाले. 1952 च्या पंडित नेहरूंच्या मध्यवर्ती मंत्रिमंडळामध्ये ते रेल्वेमंत्री झाले. त्यांनी आपले पद उत्तम तऱ्हेने सांभाळले होते; परंतु 1953 मध्ये केरळमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला. दीडशे लोक त्यामध्ये ठार झाले. ही बातमी ऐकून शास्त्रीजी अतिशय दुःखी झाले. आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

               27 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले. 9 जून 1964 रोजी शास्त्री यांची पंतप्रधान म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यांचा सर्व कारभार स्वच्छ होता. अन्यायाचा विचार देखील त्यांच्या मनात निर्माण झाला नव्हता. अत्यंत धैर्याने त्यांनी हे पद स्वीकारले .देशाची जनता गरीब आहे हे त्यांनी जाणले आणि अनेक गोष्टींचा त्याग केला. आपल्या मुलांसाठी अथवा नातेवाईकांसाठी कधी सत्तेच्या बळाचा उपयोग करून घेतला नाही.

              1965 मध्ये पाकिस्तानशी युद्ध सुरू झाले. तेव्हा कणखर भूमिका घेऊन अत्यंत धैर्याने तोंड दिले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. त्यांना सर्व सूचना दिल्या. भारतीय सैनिक प्राणपणाने लढले व त्यांचा विजय झाला. देशाचे संरक्षण केले.

               'जय जवान, जय किसान' ही त्यांची घोषणा होती. आपल्या किसानांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदराची भावना होती. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे भारताची प्रगती शेतकऱ्यांच्या प्रगतीवर अवलंबून आहे असे ते नेहमी म्हणत. शेतीच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांची मूर्ती लहान व कीर्ती महान होती. आयुष्यभर त्यांनी सन्मार्गावरून चालून देशाची सेवा केली. साऱ्या भारत वासीयांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव आहे.

              ताश्कंद येथे भारत-पाक युद्धबंदीचा करार झाला आणि तेथेच 11 जानेवारी 1966 रोजी त्यांचा देहांत झाला.

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

🎗️ महत्त्वाचे मुद्दे 🎗️


⚜️ लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 रोजी उत्तर प्रदेशात झाला.

⚜️ त्यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव परंतु त्यांनी काशी विद्यापीठात संस्कृत विषयात शास्त्री ही पदवी मिळवल्यामुळे ते शास्त्री झाले.

⚜️ त्यांच्यावर शालेय जीवनात टिळक, दादाभाई नैरोजी, महात्मा गांधी यांचा प्रभाव असल्यामुळे ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.

⚜️ 1925 मध्ये त्यांनी शास्त्री ही पदवी संपादन केली.

⚜️ 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.

⚜️ 1942 च्या लढाई येथे त्यांना अडीच वर्षाची शिक्षा झाली .

⚜️ 1952 नेहरू मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री बनले.

⚜️ पुढे नेहरू मंत्रिमंडळात दळणवळण मंत्री, गृहमंत्री अशी पदे भूषवली.

⚜️ पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर 1964 ला ते पंतप्रधान बनले.

⚜️ 1965 च्या युद्धात त्यांच्या नेतृत्वामुळे पाकिस्तानची हार झाली.

⚜️ 1965 - 66 मध्ये त्यांनी अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी देशात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

⚜️ 'जय जवान, जय किसान' या महान घोषणेचे जनक.

⚜️ 1966 मध्ये पाकिस्तानशी ताश्कंद करार केला.

⚜️ 11 जानेवारी 1966 मध्ये त्यांची ताश्कंद येथे निधन झाले.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

💠 लाल बहादूर शास्त्री यांचा जीवन परिचय हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.

👇


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


💠 लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी सराव चाचणी सोडवण्यासाठी खाली टच करा.

👇


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️