SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, January 15, 2024

गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती

 ⚜️ गोपाळ कृष्ण गोखले यांची माहिती ⚜️




गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या छोट्याशा खेड्यात 9 मे 1866 रोजी झाला. घरची गरिबी होती. सर्व संकटांना तोंड देत त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरात घेतले. एके दिवशी शिक्षकांनी एक अवघड गणित सोडवून आणण्यास सांगितले होते. गोपाळने ते वडिलांच्याकडून सोडवून आणले. शिक्षकांनी त्याची पाठ थोपटली. त्याला शाबासकी दिली. त्यावेळी गोपाळ रडू लागला. त्याने खरी गोष्ट सांगितली. वडिलांनी गणित सोडवून दिले हे सांगितले. शिक्षकांची क्षमा मागितली आणि त्या दिवसापासून सत्याने वागण्याचा निश्चय केला.

मुंबईला ते आले आणि एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी १८ व्या वर्षी बी.ए. परीक्षा उत्तीर्ण केली. इंग्रज सरकारची नोकरी मिळत असताना त्यांनी ती नाकारली आणि आपल्या देशातील पिढीवर संस्कार घडविण्याच्या निमित्ताने पुण्यातील 'न्यू इंग्लिश स्कूल' मध्ये नोकरी करू लागले. संपत्तीपेक्षा देशबांधवांवर त्याचे अधिक प्रेम होते. नंतर ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक झाले. गणिताबरोबरच इंग्रजी आणि इतिहास विषय शिकवीत होते. समोर बसलेले विद्यार्थी आपलीच मुले आहेत असे समजून गोपाळ कृष्ण गोखले अत्यंत तळमळीने गणित, इतिहास, इंग्रजी विषयांचे अध्यापन करीत होते. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी अल्पावधीत नाव कमावले. शालेय मुलांसाठी सोप्या पद्धतीने गणिताचे पुस्तक लिहिले.

समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी काढलेल्या 'सुधारक' या पत्राचे सहाय्यक संपादक म्हणून ते कार्य करू लागले. त्यामुळे समाजासाठी त्यांना अनेक गोष्टी लिहिता येऊ लागल्या. न्यायमूर्ती रानडेंचा त्यांना सहवास लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यशास्त्र व अर्थशास्त्र याचा सखोल अभ्यास केला. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते राजकारणात आले. १८९७ मध्ये ते पुण्याच्या 'सार्वजनिक सभेचे' चिटणीस झाले.

भारताच्या जमाखर्चाची तपासणी करण्याकरता नेमलेल्या 'बेल्बी कमिशन' पुढे साक्ष देण्यासाठी ते डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला निघाले. सोबत सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी होते. त्यांनी केलेले भाषण अतिशय गाजले.

१९०० साली मुंबई कौन्सिलमध्ये ते निवडून आले. १९०२ मध्ये मध्यवर्ती कायदे मंडळावर निवडले गेले. त्या वेळी सरकारी अर्थसंकल्पावर १२ भाषणे केली. ब्रिटिश सरकार भारताचे शोषण कसे करत आहे याचे स्पष्टीकरण केले. अत्यंत परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण केलेल्या या भाषणामुळे 'नेशन' या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक म्हणाले, 'इंग्लंडचे पंतप्रधान ऑस्क्कथ' यांच्यापेक्षा गोखले हे श्रेष्ठ आहेत.

नामदार गोखले हे नेहमी म्हणत, 'साध्य जसे चांगले हवे तसेच त्या प्राप्तीसाठीची साधनेदेखील चांगली हवीत.' म्हणून महात्मा गांधींनीदेखील त्यांना आपले राजकीय गुरू मानले.

१९०५ साली बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी 'भारत सेवक समाज' संस्था स्थापन केली. निष्ठावंत समाजसेवक त्यांना निर्माण करावयाचे होते. मागासलेल्या लोकांची उन्नती आवश्यक होती. ते आपले महनीय विचार अत्यंत शांत पद्धतीने मांडत होते. त्यांच्या हृदयात अपार देशभक्ती ओथंबलेली होती. वयाच्या ४९ वर्षांपर्यंत कार्य करून, भारतमातेची सेवा करून ते कृतकृत्य झाले. भारतमातेच्या चरणी त्यांनी 19 फेब्रुवारी 1915 रोजी आपला देह ठेवला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर समाजसुधारकांची माहिती पाहिजे असल्यास खालील बटनाला टच करा.



No comments:

Post a Comment