⚜️ न्या. महादेव गोविंद रानडे यांची माहिती ⚜️
महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी 16 जानेवारी 1842 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. मॅट्रिक नंतर पुढील शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये घेतले. ते बालपणापासून अतिशय हुशार होते. सर्व परीक्षेत ते प्रथम क्रमांकावर होते. कुशाग्र बुद्धी व अफाट वाचन होते. अंत:करणापासून ज्ञान ग्रहण करण्याची त्यांना आवड होती. ते एम.ए., एल.एल.बी. झाले.
न्या. रानडे यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले. त्यामुळे त्यांची बुद्धी चौफेर झाली. कॉलेजमध्ये शिकत असतानादेखील प्राध्यापक त्यांचे ज्ञान पाहून आश्चर्यचकित होत असत. 1871 मध्ये त्यांची पुण्यामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. कायद्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. आपले न्यायदानाचे काम ते अत्यंत चोख पद्धतीने करत. कायदेशीर पुराव्याचा आधार घेऊन ते निकाल देत होते. आपल्या कर्तृत्वाने प्रगती करत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
इंग्रज आपला व्यापार भारतात वाढवीत होते. शहराबरोबर खेड्यांतदेखील त्यांचा व्यापार पोहोचला होता. विलायती वस्तू खेड्यांत विकावयास सुरुवात झाल्यामुळे खेड्यांतील कारागीर बेकार होऊ लागले. भारतात खुल्या व्यापाराचे तत्त्व हानिकारक आहे, असा विचार त्यांनी अनेक लेखांतून प्रसिद्ध केला. संरक्षित व्यापाराचे तत्त्व महत्त्वाचे असून ते भारताला लाभदायक होईल असे ते म्हणत. ही गोष्ट त्यांनी प्रथम भारतीयांना समजावून सांगितली. त्यामुळे त्यांना 'भारतीय अर्थशास्त्राचे जनक' असे म्हटले जाते.
भारताची प्रगती व्हावयाची असेल तर स्त्री- पुरुष दोघांची प्रगती झाली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. तो विचार त्यांनी समाजात रुजविला. दोघांनाही शिक्षण घेणे भाग आहे. शिक्षणाशिवाय ज्ञान वाढणार नाही आणि ज्ञानाशिवाय देशाची प्रगती होणार नाही असे ते सांगत. स्त्री व पुरुषांना समान शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह होता.
आपण सारे एक आहोत, ही त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे अस्पृश्यांना कधी कमी मानू नका असे ते सांगत असत. आपणच आपल्यात भेदभाव करतो, तर मग इंग्रजांनी काळा-गोरा भेदभाव मानल्यास आपल्याला राग येण्याचे कारण काय ? असा प्रश्न ते उपस्थित करत होते. त्यामुळे आपण आपल्या देशातील अस्पृश्यतेचे पूर्णपणे उच्चाटन केले पाहिजे, असे समाजाला शिकवत होते.
न्या. रानडे उदारमतवादाचा पुरस्कार करणारे होते; त्यामुळे शांतीतून त्यांना क्रांती घडवावयाची होती. ईश्वर जवळ व सर्वत्र सम प्रमाणात आहे; तर मग हे भेदाभेद कशासाठी ? हे भेदाभेद मानवनिर्मित असून आपणच ते दूर केले पाहिजेत. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपली प्रगती करता आली पाहिजे; त्यामुळे कोणतीही दारे बंद असता कामा नये. कोणाला अडवू नये. सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर देश प्रगतिपथावर अवश्य जाऊ शकेल. उदारमतवादी मानवतावादाचा पुरस्कार न्या. रानडे यांनी केला.
मुसलमानांनंतर भारतात इंग्रजाचे राज्य आले, हा इंग्रजी इतिहासकारांचा मुद्दा चुकीचा आहे हे त्यांनी सांगितले. त्यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास केला होता. ते म्हणत, मुसलमानांची सत्ता नष्ट करून मराठ्यांनी राज्य केले. आपसातील दुहीमुळे-फितुरीमुळे व इंग्रजांच्या कपटनीतीमुळे आपणास राज्य गमवावे लागले. लोकांचे गैरसमज दूर होण्यासाठी 'राईज ऑफ दि मराठा पॉवर' हा ग्रंथ लिहिला.
न्या. रानडे आपले काम चोखपणे करत होते. पण देशहिताचा विचार सातत्याने त्यांच्या मनात निर्माण होत होता. सरकारी नोकरी व देशस्वातंत्र्याचा विचार या दोन्ही गोष्टींचा समतोल त्यांनी सांभाळलेला होता.
पुणे सार्वजनिक सभेच्या मासिकात ते अनेक वर्षे लेख लिहीत होते. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेला त्यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. उच्च पदावर नोकरी करत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सातत्याने लेखणीच्या द्वारे प्रयत्न केले.
विधवा विवाहाला त्यांची मान्यता होती. याप्रमाणे राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रांत ते समाजाला सातत्याने मार्गदर्शन करत होते. त्यामुळे लोक त्यांना महामानव मानत होते. सतत कार्यरत असल्याने म. गो. रानडे यांची प्रकृती क्षीण होत गेली व १६ जानेवारी १९०१ रोजी त्यांचे निधन झाले. म. गो. रानड्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत पोकळी निर्माण झाली.
No comments:
Post a Comment