SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label अकबर बिरबलाच्या चातुर्य कथा. Show all posts
Showing posts with label अकबर बिरबलाच्या चातुर्य कथा. Show all posts

Monday, November 14, 2022

हुशार बिरबल

 हुशार बिरबल



                   एकदा बिरबल आणि अकबर बादशहा बागेत फिरत होते. अकबर बादशहाला बिरबलाची गंमत करण्याची लहर आली. तो बिरबलाला म्हणाला, "तुला सगळेजण हुशार समजतात. तर मग सांग, आपल्या नगरात एकूण कावळे किती?

                    बिरबलाने ताबडतोब उत्तर दिले, 'नव्याण्णव हजार आठशे नव्याण्णव." बादशहाने आश्चर्याने विचारले, “ही संख्या बरोबर आहे ना? आपल्या नगरातील सगळे कावळे मोजले आणि ते कमी किंवा जास्त भरले तर?"

                   बिरबल म्हणाला, "कावळ्यांची संख्या जास्त भरली, तर शेजारच्या नगरातून पाहुणे कावळे आले असे समजावे. आणि संख्या कमी भरली, तर आपल्या नगरातील कावळे बाहेर गेले, असे समजावे "

बिरबलाच्या या हुशार उत्तरावर बादशहा खूश झाला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

 

Monday, November 7, 2022

बादशाह व बिरबलाच्या चातुर्यकथा ~ हिम्मत सर्वश्रेष्ठ

⚜️ हिम्मत सर्वश्रेष्ठ ⚜️



                    अकबर बादशहाने मनाशी विचार केला की बिरबलाला कायमचाच आपल्या दरबारात ठेऊन घ्यावा. पण तशी नेमणूक करण्यापूर्वी त्याची परीक्षा घेण्यासाठी दरबार भरवला. अकबर बादशहाने सर्व प्रथम दरबारातल्या सर्व सरदारांना तीन प्रश्न विचारले की कुणाचा मुलगा सर्व श्रेष्ठ असतो ? कुणाचा दात सर्वश्रेष्ठ असतो व कुणाचा गुण सर्वश्रेष्ठ असतो ?

              यावर सर्व दरबारी मंडळींनी विचार केला व बादशहाला खुश करण्यासाठी सांगितले की बादशहाचाच मुलगा सर्वश्रेष्ठ असतो. राजहत्तीचा दात सर्व दातात श्रेष्ठ असतो व राजविद्या हाच सर्वश्रेष्ठ गुण आहे. ही उत्तरे ऐकल्यावर बादशहाने ओळखले की सर्व सरदार खरी उत्तरे सांगू शकत नाहीत व केवळ आपली स्तुती करण्यासाठी उत्तरे रचून सांगत आहेत. बादशहाने तेच तीन प्रश्न बिरबलाला विचारले तेव्हा थोडा वेळ विचार करून बिरबलाने सांगितले की गाईचा मुलगा बैल हा सर्वश्रेष्ठ मुलगा आहे. बिरबलाचे उत्तर ऐकताच सर्व दरबार खो-खो हसू लागला. 
                  अकबर बादशहाने बिरबलाला स्पष्टीकरण विचारल्यावर बिरबल उत्तरला, "जहाँपनाह! गाईच्या मुलामुळे शेते नांगरली जातात, त्यामुळेच आपणा सर्वांना अन्न धान्य मिळते म्हणून बैल हाच सर्वश्रेष्ठ मुलगा होय. '
                 दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, म्हणजे नांगराचा दात सर्वात श्रेष्ठ दात होय कारण तो नसेल तर शेत नांगरताच येणार नाही व धान्यही पिकणार नाही. 
                  तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हिम्मत हाच गुण सर्वश्रेष्ठ आहे. तलवार चालविण्याची विद्या माहित असली तरी तलवार चालविण्याची हिम्मत नसेल तर त्या विद्येचा काही उपयोग होत नाही म्हणून हिम्मत हाच गुण सर्वश्रेष्ठ आहे.
                  बिरबलाची उत्तरे ऐकून साऱ्या दरबाराने टाळ्यांचा कडकडाट केला व त्याच्या बुध्दिमतेची प्रशंसा केली. यामुळे बादशहाने बिरबलावर खुश होऊन त्याची आपल्या दरबारात नेमणूक केली.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर इतर अकबर बिरबलाच्या चातुर्य कथा वाचायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
Whatsapp group मध्ये सामील होण्यासाठी खाली टच करा.


Sunday, November 6, 2022

लाचखोरीचे बक्षीस

⚜️ लाचखोरीचे बक्षीस ⚜️



            बिरबलाची कीर्ती ऐकून राजाने बिरबलाला आपल्या दरबारात येण्याचे निमंत्रण पाठविले. त्याप्रमाणे बिरबल दिल्लीला आला. पण बादशहाच्या राजवाड्यात मात्र त्याला कोणी जाऊ देत नव्हते. प्रत्येक पहारेकरी त्याला हाकलून लावत असे. बिरबलाने आपल्याला बादशहाणीच बोलवल्याचे सांगितले तेव्हा तेथील एका पहारेकऱ्याला लोभ सुटला व त्यांनी बिरबलाला म्हटले की 'तुम्हाला बादशहाकडून जे काही बक्षीस मिळेल त्यातील अर्धे बक्षीस तुम्ही मला दिले पाहिजे.' हे कबूल असेल तर आज सोडतो.

           बिरबला ने ते कबूल केले व बादशहाच्या दरबारात प्रवेश केला. बादशहाने बिरबलाला अनेक प्रश्न विचारले. बिरबलाने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बादशहाची मर्जी जिंकली. बादशहाने खुश होऊन त्याला काय हवे ते मागून घेण्यास सांगितले. बिरबल उत्तरला, "महाराज आपली कृपा हेच माझ्यासाठी मोठे बक्षीस आहे. पण आता तुम्ही आग्रहच करत आहात तर मला शंभर फटके मारावे अशी माझी मागणी आहे."

           बादशाहा विचित्र मागणी ऐकून गडबडून गेला व त्याने बिरबलाला काही वेगळे मागण्यास सांगितले. यामध्ये धन, शेतजमीन किंवा मोहरा हे आपणास काहीही हवे असेल तरी मी आपणास देईन. पण बिरबलाने काही ऐकले नाही. तेव्हा नाईलाजाने बादशहाने बिरबलाला 100 फटके मारण्याचा हुकूम दिला.

           100 फटके मारणारा नोकर जवळ येताच बिरबल म्हणाला, "थांबा! थांबा! माझ्या बक्षिसाचा अर्धा वाटा मी दरवाजावरील पहारेकऱ्यास देण्याचे कबूल केले आहे. म्हणून माझ्या वाटणीच्या शंभर फटक्यापैकी 50 फटके त्याला देण्यात यावे." हे ऐकल्यावर त्या पहारेकऱ्याला दरबारात बोलवण्यात आले व निम्मे बक्षीस म्हणून 50 फटके मारण्याचा हुकूम देण्यात आला. हे ऐकताच पहारेकरी घाबरला व त्याने बादशहाच्या पाया पडून पुन्हा लाचखोरी करणार नाही असे कबूल केल.

          बिरबलाच्याच विनंतीवरून बादशहांनी पहारेकर्‍याला माफ केले. व बिरबलालाही बक्षीस म्हणून 1000 मोहरा दिल्या.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

तुम्हाला जर बोधकथा वाचायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.