SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, April 4, 2024

फिरोजशहा मेहता माहिती

सर फिरोजशहा मेहता यांची माहिती




                    सर फिरोजशहा मेहता यांचा 4 ऑगस्ट 1845 रोजी जन्म मुंबईतील एका श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. मेरवानजी हे त्यांच्या वडिलांचे नाव. लहानपणापासून कुशाग्र बुद्धी व अभ्यासाची अत्यंत आवड असलेल्या फेरोजशहा मेहता यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले.

           १८६४ मध्ये ते एम. ए. झाले. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले पदवीधर होत. बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला दादाभाई नौरोजी यांची भेट झाली. त्यांचा सहवास लाभला. त्यामुळे मातृभूमीबद्दलचे प्रेम अधिकच वाढत गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास केला आणि त्याचबरोबर लॅटीन भाषेचाही अभ्यास केला. तेथे त्यांनी 'दि एज्युकेशन सिस्टिम ऑफ बॉम्बे' हा अप्रतिम निबंध लिहून ईस्र इंडिया असोसिएशनसमोर वाचून दाखविला. या निबंधामुळे त्यांना मोठा नावलौकिक प्राप्त झाला.

                 १८६२ साली ते बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. त्यांनी मुंबईत वकिलीचा व्यवसाय सुरू केला. वकिली मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्यांनी नामवंत वकील म्हणून प्रसिद्धी मिळविली. त्या वेळी मुंबई न्यायालयात काळा, गोरा असा भेदभाव केला जात होता. गोऱ्या लोकांना विशेष महत्त्व दिले जात होते, काळ्या लोकांना तुच्छ मानले जात होते. हे पाहून फिरोजशहांना राग आला. अशा प्रकारची असमानता का ? असा विचार ते करू लागले. त्यांनी या गोष्टीबद्दल वर्तमानपत्रात एक कडक निषेधपर निबंध लिहिला आणि काळ्या-गोऱ्याचा भेद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निबंधाचे सर्वांनी कौतुक केले.

                फिरोजशहा मुंबई कॉर्पोरेशनमध्ये सत्तेवर आले. ४० वर्षे त्यांनी कार्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई या विशाल नगरीची सेवा केली. चार वेळा ते महापौर म्हणून निवडून आले. त्यांनी मांडलेल्या योजना सर्वांना पसंत पडत होत्या. त्यांना मुंबईतील शासनाचे पिता असे म्हटले जाते.

                फिरोजशहा मेहता जहाल पक्षाचे असल्याने त्यांच्या विचारातून परखड शब्द प्रगट होत होते. इंग्रज सरकारच्या अनेक निर्णयांना त्यांनी जोरदार विरोध केला. त्यांनी केलेले अनेक कायदे फेरोजशहांनी रद्द करून टाकले. सन १८७४ मध्ये पारशी व मुसलमान यांच्यात दंगा सुरू झाला असताना त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. जनतेला जागृत करून इंग्रज सरकारला दंग्याची चौकशी करण्यास भाग पाडले.

               देशी वृत्तपत्रांवर अनेक बंधने घालण्यात आलेल्या प्रेस अॅक्टला त्यांनी कडाडून विरोध केला. सर रिचर्ड टेंपल या गव्हर्नरचा मुंबईत पुतळा उभारण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता; परंतु त्याला फिरोजशहांनी कडक विरोध केला. १८८६ साली ते मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून कायदेमंडळाचे व १८९२ मध्ये इंपीरियल कौन्सिलचे सदस्य झाले. तेथे असताना त्यांनी शासकीय खर्चात काटछाट करण्याचा आग्रह धरला. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.

            त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना केली. जनजागृतीसाठी बॉम्बे क्रॉनिकल हे दैनिक काढले. त्यामधून ते आपले विचार निर्भयपणे मांडत असत. इंग्रजी आणि गुजराती भाषेतील दैनिकातून अनेक विचारवंत आपले विचार मांडू लागले.

              फिरोजशहा दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. एखाद्या सिंहाप्रमाणे ते गर्जना करून आपले विचार प्रगट करत होते, म्हणून त्यांना 'मुंबईचा सिंह' असे म्हणत. त्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या कार्यामुळे सरकारने त्यांना सर, सी.आय.इ. इत्यादी पदव्या देऊन गौरव केला. त्यांच्या मनात भारतीय जनतेबद्दल कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. राष्ट्राच्या प्रगतीसाठी ते सदैव प्रयत्नशील होते. त्यांनी सारे जीवन समाजाच्या कल्याणासाठी वेचले. अशा या महामानवाचा मृत्यू 5 नोव्हेंबर 1915 रोजी झाला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP GROUP  मध्ये जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

No comments:

Post a Comment