SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, December 21, 2022

साने गुरुजी यांची माहिती मराठी

 ⚜️ साने गुरुजी ⚜️



          महाराष्ट्रातील तळमळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती; तरीही अत्यंत कष्ट करून, माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले.

            घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टात त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली. पालगड, दापोली व औंध येथे त्यांचे शिक्षण झाले. १९१८ मध्ये ते मॅट्रिक झाले. नंतर ते पुण्यात येऊन बी.ए. झाले. १९२४ मध्ये अंमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात काम करत ते एम.ए. झाले. त्यानंतर ते अंमळनेरच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले. तेथील वसतिगृहाचे ते काम करत असत. वसतिगृहातील मुलांची ते अतिशय काळजी घेत. मातेच्या ममतेने ते त्यांची देखभाल करत होते. गरिबी त्यांनी स्वत: अनुभवलेली होती आणि मुलांबद्दल करुणाभाव होता. विद्यार्थीही त्यांच्यावर अतिशय प्रेम करत असत.

          १९३० मध्ये महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली. त्या वेळी गुरुर्जीनी आपली नोकरी सोडून चळवळीत उडी घेतली. त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा भोगावी लागली व त्यांनी ती आनंदाने भोगली. धुळ्याच्या तुरुंगात त्यांना विनोबा भावे यांचा सहवास लाभला. विनोबा भावे गीतेवर प्रवचने देत होते. ती प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली. ती प्रवचने 'गीता प्रवचने' नावाने पुढे प्रसिद्ध झाली. या पुस्तकाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. गुरुजींनी रवींद्रनाथ टागोर, पं. जवाहरलाल नेहरू यांची चरित्रे लिहिली.

             भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे गुरुजींना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. नाशिक येथे ते शिक्षा भोगत होते. तुरुंगात असताना त्यांनी 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिले.

             आचार्य अत्रे यांनी श्यामची आई यावर एक चित्रपट निर्माण केला. या चित्रपटास राष्ट्रपती पदक मिळाले. साने गुरुजींनी गावोगावी फिरून स्त्रियांच्या ओव्यांचे संकलन केले आणि 'पत्री' या नावाने ते पुस्तक प्रसिद्ध केले. दहा भागांमध्ये मुलांसाठी 'गोड गोड गोष्टी' ही पुस्तके लिहिली. त्यामुळे मुलांचे ते अतिशय आवडते झाले. 'भारतीय संस्कृती' हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' तसेच 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' अशी सुंदर गीते लिहिली. त्यांनी जवळ जवळ ८० पुस्तके लिहिली.

               १९३८ साली स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी 'काँग्रेस' नावाचे साप्ताहिक काढले. १९४२ साली 'भारत छोडो' या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य लाभले. समाजात ऐक्याची भावना निर्माण होण्यासाठी त्यांनी 'आंतरभारती'मार्फत हे कार्य चालू केले.

             साने गुरुजी पंढरपूरला आले त्यावेळी पंढरपूरच्या मंदिरात जाण्यास अस्पृश्यांना बंदी होती. साने गुरुजी तेथेच आमरण उपोषणास बसले. अस्पृश्यांच्या स्पर्शाने देव अस्पृश्य कसा होऊ शकेल हे साने गुरुजी लोकांना १११ भारतीय महामानव / १०९ पटवून देत होते. उलट देवाच्या स्पर्शाने सर्वजण परमपवित्र बनतात असे ते सांगत. एकीकडे आपण देव सर्वत्र सम प्रमाणात भरला आहे, असा वेदांतील विचार सर्वांना सांगतो आणि दुसरीकडे भेदाभेद करतो हे साने गुरुजींना मान्य नव्हते. त्यांच्या उपोषणामुळे पांडुरंगाचे मंदिर सर्वांना खुले झाले आणि हरिनामाच्या जयघोषात सर्वांना पांडुरंगाचे दर्शन मिळू लागले. 'पांडुरंग' या व्यक्तीने पांडुरंगाचे मंदिर खुले केले. कारण त्यांच्यातील 'पांडुरंग' जागा झाला होता.

               साने गुरुजींनी काँग्रेस पक्ष सोडला व ते समाजवादी पक्षात गेले. त्यांनी 'साधना' नावाचे साप्ताहिक काढले. स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती ज्या प्रमाणात व्हावी असे त्यांना वाटत होते, त्या प्रमाणात ती झाली नाही; त्यांनी भारतमातेची सेवा करता करताच तिच्या चरणी जीवन अर्पण केले.

          अशा या थोर साहित्यिकाचा मृत्यू 11 जून 1950 रोजी झाला.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

साने गुरुजी यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे 

⚜️ जन्म- 24 डिसेंबर 1899 कोकणात पालगड जि. रत्नागिरी येथे झाला. 

⚜️ नाव- पाडुरंग सदाशिव साने.

⚜️ अंमळमेर येथे प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून असताना तेथील विद्यार्थ्यांनी गुरुजी ही पदवी बहाल केली. आचार्य विनोबा भावेंनी साने गुरुजींचा अमृतपुत्र पुत्र असा गौरव केला

⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग आंदोलनात साने गुरुजींनी भाग घेतला. स्वातंत्र्याची शपथ घेऊन शिक्षकांसमोर भाषण दिले.

⚜️ 1930 ला धुळे तुरुंगात असताना ते आपल्या सहकारी राजबंदयांचा अभ्यासवर्ग घेत. त्यामुळे त्यांना गुरुजी संबोधले जाई. याच तुरुंगात विनोबा भावे यांनी अठरा प्रवचने दिलीत. ती सर्व साने गुरुजींनी लिहून काढली. त्यामुळे विनोबाजींचा गीता प्रवचने हा ग्रंथ तयार झाला.

⚜️ साने गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. 1932 ला नाशिक तुरुंगात असताना श्यामची आई ही अविस्मरणीय कादंबरी त्यांनी लिहिली.

⚜️ 1936 ला फैजपूर येथे खानदेशात काँग्रेस अधिवेशन झाले. ते यशस्वी करण्यासाठी साने गुरुजींनी श्री धनाजी नाना चौधरी यांच्या सोबत हजारो तरुणांना स्वयंसेवक म्हणून तयार केले.

⚜️ 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग याबद्दल तुरुंगवासही झाला.

⚜️ 1945 मध्ये त्यांची सुटका झाली.

⚜️ 1946 मध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे यासाठी उपोषण केले. मंदिर सर्वांसाठी खुले झाले.

⚜️ राष्ट्रसेवादल, आंतरभारती अशा संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या श्यामच्या आई या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. तो राष्ट्रपतीद्वारे दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळाचा/पुरस्काराच मानकरी ठरला.

⚜️ पं. नेहरूंच्या भगिनी कृष्णा हाथीसिंग यांच्या वुड्थ नो रिग्रेट्स या आत्मचरित्राचे मराठीत ना खंत ना खेद असे भाषांतर केले.

⚜️ 1928 मध्ये त्यांनी विद्यार्थी नावाचे मासीक सुरु केले. 1938 मध्ये काँग्रेस या नावाचे साप्ताहीक सुरु केले.

⚜️ 1948 मध्ये साधना हे साप्ताहीक सुरु केले. गांधी हत्येनंतर 21 दिवसांचे निर्जल उपोषण केले.

⚜️ आचार्य अत्रेंनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार मृत्यृचे चुंबन घेणारा महाकवी.

⚜️ त्यांची ग्रंथसंपदा - श्यामची आई भारतीय संस्कृती, क्रांती, समाजधर्म स्त्री जीवन, पत्री, गीताहृदय, गोड गोष्टी आपण सारे भाऊ, आस्तिक, धडपडणारी मुले, सुंदर पत्रे, श्यामची पत्रे, ना खंत ना खेद इत्यादी

⚜️ 11 जून 1950 ला साने गुरुजींनी आपणहून या जगाचा निरोप घेतला.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

साने गुरुजी यांचा जीवन परिचय व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञानावरील व्हिडिओ पाहण्यासाठी खाली टच करा

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

साने गुरुजी यांची सराव चाचणी सोडवण्यासाठी खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️


No comments:

Post a Comment