⚜️ सरदार वल्लभभाई पटेल ⚜️
सरदार वल्लभभाई पटेल यांची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. वडिलांचे नाव जव्हेरभाई. त्यांचे कुटुंब गरीब शेतकरी होते. घरची गरिबी असल्यामुळे अत्यंत कष्टाने त्यांनी शिक्षणास सुरुवात केली. १८९७ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. बालपणापासून ते करारी व अन्यायाची चीड असणारे पोलादी पुरुष होते. शाळेतील एक गुरुजी विद्यार्थ्यांना अतिशय मारत होते. अशा वेळी वल्लभभाईंनी विद्यार्थ्यांना संघटित करून तीन दिवस संप करून गुरुजींना नम्रतेने वागायला शिकवले. अतिशय मेहनत करून उधार-उसनवार करून ते इंग्लंडला गेले आणि १९१३ साली बॅरिस्टर होऊन ते भारतात आले. अहमदाबादला काही दिवस त्यांनी वकिली केली. वकिली व्यवसायात त्यांना भरपूर पैसे मिळाले.
गांधीजींच्या देशसेवा कार्याने अतिशय प्रभावित झाले आणि आपला वकिली व्यवसाय त्यांनी सोडून दिला. गांधीजींच्या सान्निध्यात राहून त्यांनी देशसेवा करण्याचा निश्चय केला. असहकाराच्या चळवळी मध्ये भाग घेतला असताना त्यांना अनेक वेळेला कारावास भोगावा लागला.
अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी अहमदाबाद शहरात अनेक सुधारणा केल्या. गुजराथ विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. १९२७ साली गुजरातमध्ये अतिवृष्टी झाली व सर्वत्र पाणी पसरले. त्यावेळी वल्लभभाईनी सर्वांना सहकार्य केले. कपडे, धान्य आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करून पूरग्रस्तांना दिल्या.
बार्डोलीच्या शेतकऱ्यांचा सत्याग्रह हा वल्लभभाईंच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. १९२८ मध्ये गुजराथेतील बार्डोली नावाच्या भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा सरकारने कारण नसताना वाढविला. शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली; पण सरकारने ऐकले नाही. वल्लभभाईंनी शेतकऱ्यांची संघटना करून सारा द्यायचा नाही, असे सांगितले. शेतकऱ्यांनी सारा दिला नाही. इंग्रजांनी खूप त्रास दिला; परंतु शेतकऱ्यांनी ऐकले नाही व सारा दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सरकारला नमते घ्यावे लागले. त्यांनी आपला हुकूम मागे घेतला.
१९३१ साली कराची येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९४२ साली 'भारत छोडो' चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वल्लभभाई पटेल गृहमंत्री झाले. त्या वेळी देशात लहानमोठी ५२६ संस्थाने होती. ब्रिटिशांनी त्या संस्थानांना सार्वभौम अधिकार दिले होते. त्यामुळे संस्थाने स्वतःला स्वतंत्र समजत होती. स्वतंत्र भारतातील ५२६ संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. याचे खरे श्रेय वल्लभभाई पटेल यांना आहे. ते भारताचे पोलादी पुरुष होते.
सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार वल्लभभाई पटेल यांनी केला. तसेच हे मंदिर सर्वांसाठी खुले केले. ते गृहमंत्री असताना गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला अतिशय लागली आणि त्यामुळे ते आजारी पडले. भारतमातेची सेवा करता करता त्यांनी आपला देह ठेवला.
अशा या महामानवाचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 रोजी झाला
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे
⚜️ जन्म 31 ऑक्टोंबर 1875 ला खेडा जिल्हा, गुजरात राज्यात.
⚜️ 1917 ला खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व करुन साराबंदी घडवून आणली. 1920 च्या असहकार चळवळीत भाग घेतला. वकिली सोडली.
⚜️ 1928 ला बार्डोली साराबंदी सत्याग्रह केला.
⚜️ 1928 च्या बार्डोली सत्याग्रहामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना सरदार हा बहुमान दिला.
⚜️ 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग
⚜️ भारताचे पोलादीपुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते. भारत छोडो आंदोलनामध्ये ते सहभागी होते. यासाठी कारावास. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते.
⚜️ सुमारे 600 संस्थानांचे विलीनीकरण केले. भारताचे एक महत्वाचे राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांचे भारतीय राजकारणात महत्वाचे योगदान आहे.
⚜️ त्यांना भारतीय बिस्मार्क असे म्हणतात.
⚜️ त्यांचा मृत्यु 15 डिसेंबर 1950 मध्ये झाला.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
महामानवांचा जीवन परिचय वाचण्यासाठी खालील चित्राला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment