SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, February 29, 2024

अक्षय्य तृतीया

  ⚜️ अक्षय्य तृतीया माहिती ⚜️

 वैशाख महिना हा मराठी महिन्यातील दुसरा महिना. या वेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते त्याचा परिणाम सभोवतालच सृष्टीवर पडतो. म्हणून या महिन्याला वैशाख वणवा असंही म्हणतात. त्यामुळे थंड पाणी पिणे, थंड पाण्याने आंघोळ करणे आल्हाददायक वाटते.

या महिन्यात महत्वाचे सण व उत्सव येतात. त्यांत अक्षय तृतीया हा सण मोठा असतो. तो साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. अक्षय म्हणजेच जे सतत राहते ते. म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. त्यामुळे त्या दिवशी जप, होम, दान केले जाते. ही तृतीया बुधवारी आली व त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षय तृतीया महा पुण्यकारक समजली जाते.

हा सण विष्णुप्रीत्यर्थ आहे. या दिवशी वसंतमाधवाची पूजा व तृषितांसाठी उदक कुंभ दान केले जातात. या महिन्यातील व्रत-वैकल्ये या महिन्याच्या हवामानाला अनुसरूनच केलेली आहेत. या महिन्यात सर्व वातावरण तापलेले असते. त्यामुळे या महिन्यात गरिबांना कुंभदान, सार्वजनिक पाणपोई सुरू करणे, गरजूंना पंखा, छत्री, चंदन यांचे दान करावे असे म्हटले जाते. वसंतोत्सव साजरा करून स्त्रिया कैरीचे पन्हे देतात. तर मृत पितरांसाठी श्राद्ध अपिंडक किंवा तीळ तर्पण केले जाते. आपले पूर्वज पाणी पिण्यास येतात अशी कल्पना आहे.

या मुहूर्तावर शेतकरी आपल्या कामास सुरुवात करतात. विशेषतः देशावर हा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जातो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.


No comments:

Post a Comment