SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, February 5, 2024

पंडित मोतीलाल नेहरू

 ⚜️ पंडित मोतीलाल नेहरू ⚜️


पंडित मोतीलाल नेहरू यांचा जन्म आग्रा येथे 6 मे 1861 रोजी झाला. मोतीलाल यांच्या जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झाले. वडील मुलाचे तोंडदेखील पाहू शकले नाहीत. त्यांचे मोठे बंधु नंदलाल यांनी लालनपालन केले. 

           नेहरू कुटुंब हे मूळचे काश्मीरमधील. त्यांचे घराणे म्हणजे कौल. आठव्या शतकात फरूकसिअर या मोगल बादशहाच्या निमंत्रणावरून त्यांचे पूर्वज दिल्लीला आले आणि 'नहार' च्या म्हणजे कालव्याच्या काठी त्यांनी घर बांधले. म्हणून त्यांचे कौल नाव मागे पडून त्यांना नेहरू या नावाने संबोधले जाऊ लागले. मोतीलाल यांचे वडीलबंधू नंदलाल आरंभी आग्रा येथे वकिली व्यवसाय करत होते; परंतु आग्रा येथील उच्च न्यायालय अलाहाबादला गेले. पंडित नंदलाल सर्व कुटुंबासह अलाहाबादला आले. तेथे वकिली करू लागले. त्यामुळे मोतीलाल यांचे शिक्षण अलाहाबाद येथे सुरू झाले.

            अलाहाबादला पार्शियन व अरबी भाषांचे ते पंडित झाले. वकिलीच्या परीक्षेत ते प्रथम आले आणि त्यांना सुवर्णपदक मिळाले. अलाहाबादला वकिली सुरू केली. कायद्याच्या ज्ञानात ते अतिशय निष्णात होते. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे येऊ लागले. वकिली व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यांचे राहणीमानही उच्च दर्जाचे होते.

पंडित मोतीलाल यांचा विवाह बालपणीच झाला; परंतु पहिली पत्नी वारल्यामुळे त्यांनी दुसरा विवाह स्वरूप राणीशी केला. त्यांना पहिला मुलगा झाला. ते म्हणजे जवाहरलाल; नंतर मुलगी विजयालक्ष्मी, नंतर एक मुलगी झाली, तिचे नाव कृष्णा.

             वकिली मोठ्या प्रमाणात सुरू होती, अशा वेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी करत असलेल्या चळवळीकडे पं. मोतीलाल यांचे लक्ष गेले. म. गांधींच्या विचाराने ते प्रभावित झाले. 1905 साली ते प्रत्यक्षात राजकारणात उतरले. प्रारंभीच्या काळात ते मवाळ पक्षाचे सदस्य होते. 1917 साली लखनौ येथे संयुक्त प्रांताची राजकीय परिषद आयोजित केली होती. त्या वेळी मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते. या राजकीय परिषदेत पंडित मोतिलाल नेहरूंनी जे विचार मांडले, त्याचा परिणाम इंग्रजांच्या ध्येयधोरणांवर पडला.

                  राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांनी वकिली सोडली. असहकार चळवळीत भाग घेतला. विदेशी वस्तूंचा त्याग केला. खादीचे कपडे वापरू लागले. परदेशी मित्रांचे संबंध तोडून टाकले. आपल्या मुलीला इंग्रजी शाळेतून काढून टाकले. इंग्रजांविरुद्ध आंदोलन केल्यामुळे कारावासांची सजा झाली. ती सजा त्यांनी आनंदाने भोगली.

             अमृतसर आणि कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनात ते अध्यक्ष होते. त्यांनी केलेली अध्यक्षीय भाषणे अतिशय गाजली. जहाल शब्दांत त्यांनी इंग्रज शासनाच्या विरोधात विचार मांडले. १९२९ साली सर्वपक्षीय समितीने एकमुखाने तयार केलेला 'नेहरू रिपोर्ट' अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. ते शक्य नसेल, तर तूर्त वसाहतीचे राजकारण चालेल असे त्यांनी सांगितले. अपमानकारक पारतंत्र त्यांना नको, ही मोतिलाल नेहरूंची धारणा होती.

              पंडित मोतीलाल यांनी 'आनंद भुवन' हा भव्य प्रासाद राष्ट्राला अर्पण केला. 1930 साली दांडीयात्रेत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा सोसावी लागली. दम्याचा विकार जडल्यामुळे त्यांचे निधन 6 फेब्रुवारी 1931 रोजी झाले.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर समाजसुधारकांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.



No comments:

Post a Comment