SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, November 14, 2022

भाषण ~ आचार्य विनोबा भावे

 आचार्य विनोबा भावे



                 आदरणीय व्यासपीठ, अध्यक्ष महोदय व येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो. मी आज तुम्हाला भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या विषयी काही माहिती सांगणार आहे ती आपण शांतपणे ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.

             महात्मा गांधीजींच्या सहवासात साबरमती आश्रमात विनोबा भावे राहत होते.आश्रमातील मामासाहेब फडके यांच्या सूचनेवरून महात्माजींनी त्यांचे नाव विनोबा असे ठेवले.

             एके दिवशी संध्याकाळी आश्रमातील सर्व कामे अटोपल्यावर विनोबा साबरमतीच्या वाळवंटात उपनिषदातील श्लोक गोड गळ्याने म्हणत होते. हे श्लोक काही विद्यार्थ्यांनी ऐकले व ते विनोबाजींना म्हणाले,‘आपण आम्हाला संस्कृत शिकवा' ही विद्यार्थांची मागणी विनोबाजींनी आनंदाने मान्य केली.तेव्हापासून ते आचार्य विनोबा भावे झाले.

                  या थोर आधुनिक संताचा जन्म ११सप्टेंबर १८९५रोजी झाला. ११ सप्टेंबरला त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते.

                      विनोबाजी भावे महात्मा गांधीजीचे सच्चे शिष्य होते.वर्ध्याचे सात्विक प्रवृत्तीचे शेठ जमानालाल बजाज यांची साबरमती आश्रमाप्रमाणे वर्ध्याला आश्रम सुरू करण्याची इच्छा होती. एप्रिल १९२१ रोजी आचार्य विनोबाजींनी वर्ध्याला जात्यांचे पुजन करून व दळण दळून आश्रमाची स्थापना केली. वर्धा आश्रम नावारूपाला आला.

               भूदानाच्या कार्यामुळे विनोबाजींना जागातील कीर्ती मिळाली. १८ एप्रिल, १९५१ रोजी 'पोचमपल्ली' या आंध्रमधील गावात त्यांना नवा प्रकाश मिळाला.

              त्या गावातील भूमिहीनांनी विनोबाजींना आमच्या १६ कुटुंबासाठी ८० एकर जमीन मिळाल्यावर आमचे जीवन सुखी होईल. ती मिळावी, अशी मागणी केली. शासनाकडून हे काम होण्याची विनोबांना खात्री नव्हती विनोबाजींनी त्याच गावच्या ग्रामस्थांसमोर ही अडचण मांडली आणि काय आश्चर्य, रामचंद्र रेड्डी या जमीनदाराने १०० एकर जमीन या कामासाठी दान केली. त्यातून 'भूदान चळवळीचा उगम झाला. या चळवळीमार्फत चौदा वर्षे ३६००० मैल पायी प्रवास करून लाखो एकर जमीन मिळवून भूमिहीनांना वाटून महान कार्य केले. यास 'भूदान यज्ञ' असे म्हणतात.

               भारताचे हे आधुनिक संत १५ नोहेंबर, १९८२ रोजी आपणास सोडून गेले. शासनाने मरणोत्तर त्यांना 'भारतरत्न' ही पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

विनोबाजी आपणास सोडून गेले त्यांना आदरांजली वाहू मी माझे भाषण संपवतो.

 जय हिंद ! जय महाराष्ट्र !

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर निबंध पाहिजे असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️



No comments:

Post a Comment