⚜️ चुकीचा मार्ग ⚜️
एक अतिशय सुंदर जंगल रान होते. त्या रानात एक पांढरा शुभ्र ससा राहात होता. ससा म्हटला म्हणजे तो फक्त हिरवे गवत खाऊन जीवन जगणारा प्राणी. त्या सशाला कोवळे गवत फार आवडायचे. त्यामुळे तो रानात जास्त कष्ट न घेता आपल्या घराजवळील कोवळे आणि लुसलुशीत हिरवे गवत खाऊन पोट भरत असे.
ससा स्वभावाने अतिशय साधा व सरळ होता. त्याला जंगली प्राण्यांच्या वृत्तीबद्दल काहीही माहीत नव्हते. त्यांच्या स्वभावाची त्याला जरादेखील कल्पना नव्हती. कारण जंगलात अनेक प्रकारचे प्राणी रहात असतात.
एकंदरीत खरी गोष्ट अशी होती की, त्या सशावर एक लबाड लांडगा टपून बसलेला होता. त्या सशाची शिकार करून त्याचे मऊ मांस खाण्याची त्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा जेव्हा लांडगा सशाला पाहायचा तेव्हा तेव्हा त्या लांडग्याच्या तोंडाला पाणी सुटत असे व मनात एक विचार येत असे की, आपण ह्या सशाला केव्हा खाऊ. परंतु तो ससा काही लांडग्याच्या हाती लागत नव्हता. एकदा त्या लांडग्याने तशी संधी साधलीच व सशावर नजर ठेवून त्याने त्याचा पाठलाग केला; सशाला हे माहीत नव्हते. ससा आपल्याच नादात रानात गवत खात फिरत असताना अचानकपणे लांडग्याने त्याच्यावर झडप घातली. परंतु सशाचे दैव आडवे आले व तो सुदैवाने लांडग्याच्या तावडीतून सुटून जीव घेऊन पळत सुटला.
ससा पळत होता. त्याला फक्त आपला जीव वाचविण्याची चिंता होती. जीव घेऊन पळण्याच्या नादात आपण कुठे जात आहोत याचे त्याला अजिबात भान नव्हते. कारण अशा प्रसंगी कोणालाही भान रहात नाही. पळता पळता त्याला एक गुहा दिसली. त्या गुहेत खूप अंधार होता. तेथे तो आपला जीव धरून बसला. त्याला हायसे वाटले. आपला जीव वाचल्याचे त्याला समाधान वाटले. परंतु ते समाधान थोड्याच वेळपर्यंत टिकले. कारण त्याला लगेच वाघाची डरकाळी ऐकू आली. ती ऐकून सशाची पाचावर धारण बसली. कारण वाघ म्हटल्यानंतर जंगलाचा राजा ! म्हणून ससा घाबरला.
वाघाने सशाला आपल्या गुहेत पाहून आनंद व्यक्त केला. कारण त्याला आयती शिकार मिळणार होती. त्याप्रमाणे वाघाने एका क्षणात सशाचा चट्टामट्टा केला. म्हणजेच सशाला खाऊन टाकले.
⚜️ तात्पर्य ⚜️
प्रत्येक माणसाने एखाद्या छोट्याशा संकटातून बाहेर पडण्याकरिता सारासार विचार न करता कोणताही निर्णय घेतला व तो चुकीच्या मार्गाने गेला तर हमखासपणे तो मनुष्य मोठ्या संकटात सापडतो.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment