⚜️ एका शब्दाची विविध रूपे ⚜️
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लहानपणी शाळेत असताना त्यांच्या गुरुजींनी एकदा त्यांना एक गृहपाठ दिला होता.
गृहपाठात एक निबंध लिहायचा होता. निबंधाचा विषय संतांशी निगडित होता.
टिळकांनी निबंध लिहुन शाळेत नेला.
तो गुरुजींनी तपासला आणि काही ठिकाणी खुणा केल्या.
निबंधात संत हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहिला होता. संत, सन्त, सन् त अशा तीन पद्धतीने हा एकच शब्द लिहिला होता.
गुरुजी वर्गात सर्वांसमोर म्हणाले “काय रे बळवंता, संतांवर निबंध लिहितोस आणि संत हा शब्द कसा लिहायचा हे लक्षात राहत नाही होय तुझ्या?”
त्यांनी फळ्यावर “संत” असं लिहुन म्हणाले “असं लिहायचं सोडुन ह्या काय विचित्र पद्धतीने शब्द लिहिलेत?” मग त्यांनी फळ्यावर इतर दोन्ही प्रकारे तो शब्द लिहिला आणि त्यावर फुल्या मारल्या.
बाळ उभा राहिला आणि म्हणाला “पण गुरुजी इतर दोन पद्धती सुद्धा बरोबरच आहेत. जोडाक्षरं लिहायच्या पद्धती वेगळ्या असल्या म्हणुन शब्द चुकत नाही.”
गुरुजींना विद्यार्थ्याने त्यांना दुरुस्त करणे आवडले नाही. “मला अक्कल शिकवतोस होय? संत हीच बरोबर पद्धत आहे. गृहपाठ होता म्हणुन ठीक आहे. परीक्षेत असा चोंबडेपणा केलास तर गुण कापीन तुझे.” असे म्हणुन त्यांनी बाळच्या हातात वही देऊन टाकली.
बाळचे समाधान झाले नव्हते. वर्ग संपल्यावर तो मुख्याध्यापकांकडे गेला. त्याने आपला निबंध त्यांना दाखवला आणि गुरुजींचे शेरेसुद्धा सांगितले.
मुख्याध्यापकांना टिळकांचे म्हणणे पटले. चाकोरीबाहेरचा विचार करण्याची टिळकांची क्षमता आणि आपली बरोबर असल्याची खात्री असताना त्यावर ठाम राहण्याची वृत्ती पाहुन कौतुक वाटले.
त्यांनी त्या शिक्षकांना बोलावुन समजावले. तिन्ही पद्धती बरोबर असल्याचे सांगितले. शिक्षकांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि असे शब्द लिहिल्यास गुण कापणार नाही ह्याची खात्री दिली.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment