SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, September 6, 2022

आचार्य विनोबा भावे

 आचार्य विनोबा भावे



       

   महात्मा गांधींचे अनुयायी, भूतान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे नावाच्या एका खेड्यामध्ये 11 सप्टेंबर 1895 साली झाला. आईचे नाव रुक्मिणीदेवी व वडिलांचे नाव नरहर. नोकरीनिमित्त बडोद्याला राहत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण बडोद्यालाच झाले. इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईला निघाले. त्यावेळी मध्येच सुरत येथे उतरले व संस्कृतचा अभ्यास करावा म्हणून ते काशीला गेल.

         काशी येथील वास्तव्यात त्यांनी हिंदू विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे विचार ऐकले. त्या विचारांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. महात्मा गांधींनी त्यांना विनायक म्हणण्याऐवजी विनोबा हे नाव दिले. 7 जून 1916 मध्ये त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतली. आणि अजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. ते साबरमतीच्या आश्रमात राहून साधना करू लागले. परंतु महात्मा गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे वाईच्या प्राज्ञ शाळेत जाऊन केवलानंद सरस्वती यांच्याकडून शंकरभाष्य, ब्रह्मसुत्रे, पतंजली योगसूत्रे इत्यादी ग्रंथांचे अध्ययन केले. 1918 मध्ये ते साबरमतीस पुन्हा आले. 1921 मध्ये सत्याग्रह केला. आश्रमाची एक शाखा वर्ध्याला निघाली. त्या शाखेचे संचालक म्हणून गांधीजींनी विनोबांची नेमणूक नेमणूक केली.

        विनोबांना लहानपणापासून धार्मिक ग्रंथ वाचण्याची अत्यंत आवड होती. त्यांनी वेद, ब्रह्मसुत्रे ,उपनिषद, भगवद्गीता इत्यादी ग्रंथांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे " कुराण व बायबल " या ग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला. भगवद्गीता हे वेदांचे सार आहे. आपल्या आईसाठी त्यांनी गीतेचा समशलोकी अनुवाद केला. यालाच " गीताई " या नावाने ओळखले जाते.

       1930 ते 32 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत विनोबांनी भाग घेतला. त्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा झाली. धुळे येथील तुरुंगात असताना त्यांनी गीतेवर जी प्रवचने दिली ती साने गुरुजींनी लिहून घेतली. पुढे ती " गीता प्रवचने " म्हणून ग्रंथबद्ध झाली.

       1940 साली महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीमध्ये विनोबांची निवड झाली. ते आदर्श सत्याग्रही होते. गांधींच्या सत्य व अहिंसा या तत्त्वाचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला. हिंसेने जगात कोणाचे कार्य सफल होणार नाही याची त्यांना जाणीव झाली. अहिंसेमध्ये फार मोठी ताकद आहे व सामर्थ्य आहे, हे त्यांनी ओळखले होते. विनोबांनी मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम अशा विविध भाषा अवगत केल्या होत्या.

        विनोबा गावोगावी जाऊन आपल्या जनतेचे विचार पुस करत. त्यावेळी त्यांना समाजात मोठ्या प्रमाणात असलेली विषमता दिसली. काही लोकांकडून भरपूर जमीन आहे, तर काही लोकांकडे अजिबात जमीन नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे त्यांच्या मनात करुणा निर्माण झाली. यातून काही मार्ग काढायचा त्यांनी विचार केला आणि भूदान चळवळ उभी राहिली. श्रीमंतांना भेटून काही गरीब लोकांना जमीन देण्यासाठी त्यांनी हात जोडून विनंती केली.

         विनोबांची ही नम्र विनंती अनेकांनी मान्य केली. तसेच 14 वर्षे ते भारतभर हिंडले. 40 हजार मैलांचा प्रवास त्यांनी पायी केला. मोठमोठ्या जमीनदारांकडून त्यांनी 45 लाख एकर जमीन मिळवली व तिचे गरीब कष्टकरी लोकांमध्ये वाटप करून दिले. अशा प्रकारे भूदान चळवळीचा प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात सुरू झाला. विनोबांचे हे कार्य कोणी विसरू शकणार नाही.

        विनोबांनी आपले संपूर्ण आयुष्य देवासाठी आणि देशासाठी अर्पण केले. त्यांनी मधुकर, क्रांतदर्शन, जीवनदर्शन, स्थितप्रज्ञदर्शन, पुराणदर्शन, संतांचा प्रसाद, विचार पोथी, उपनिषदांचा अभ्यास इत्यादी अनेक ग्रंथ लिहिले. जे आजही अत्यंत आवडीने वाचले जातात.

         महात्मा गांधींच्या सानिध्यात राहिल्यामुळे आणि त्यांनी सांगितलेल्या एकादशव्रताचे आचरण केल्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अत्यंत साधी राहणी आणि समाजाच्या कल्याणाचा ध्यास यामुळे त्यांना "आधुनिक संत" म्हटले जाते. आयुष्याची शेवटची दोन वर्ष वर्धा पवणार जिल्ह्यातील "परमधाम" आश्रमात होते. आपला अंतकाळ जवळ आला आहे, याची त्यांना जाणीव झाल्यामुळे त्यांनी अन्न - पाणी व औषध यांचा पूर्ण त्याग केला. ईश्वराचे चिंतन करत करतच भगवंतांच्या  चरणकमलाशी एकरूप झाले.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

आचार्य विनोबा भावे ~ महत्त्वाचे मुद्दे

⚜️ जन्म ~ 11 सप्टेंबर 1895 गागोदे , पेन जिल्हा ~ रायगड

⚜️ नाव ~ विनायक नरहर भावे

⚜️ विनोबांचे सुरुवातीचे शिक्षण बडोद्यास झाले.

⚜️ संस्कृतचे शिक्षण बनारस येथे घेतले.

⚜️ विनोबा हे नाव गांधीजींनी दिले.

⚜️ विनोबांचे गुरु गांधीजी होते.

⚜️ विनोबांनी गांधीजींच्या साबरमती आश्रमात अध्यापनाचे कार्य केले.

⚜️ 1920 मध्ये गांधीवादी नेते शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या आश्रमाची एक शाखा सेवाग्राम वर्धा येथे काढली. या शाखेचे संचालक म्हणून विनोबांची गांधीजींनी नेमणूक केली.

⚜️ सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान धुळे जेलमध्ये असताना त्यांनी गीतेवर प्रवचने दिली.

⚜️ वर्धा जिल्ह्यात पावणार येथे परमधाम आश्रम काढला.

⚜️ भूमिहीनांना जमीन देण्यासाठी 1951 पासून भूदान चळवळ चालवली. या चळवळीची सुरुवात आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली या गावापासून केली.

⚜️ भूदान चळवळीतील पहिली जमीन दाता ~ रामचंद्र रेड्डी (100 एकर जमीन दान केली)

⚜️ लाखो एकर जमिनीचे गरीब ,भूमिहीन यांना वाटप केले.

⚜️ चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.

⚜️ 1940 च्या गांधीच्या वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनातील पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा होते.

⚜️ रॅमन मेगासिस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय विनोबा भावे (1958) होते.

⚜️ विनोबा भावेंना 1983 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविले.

⚜️ लोक त्यांना आचार्य विनोबा भावे म्हणून ओळखतात.

⚜️ सर्वोदय समाजाची स्थापना केली.

⚜️ महाराष्ट्र धर्म हे मासिक चालविले.

⚜️ लेखक गीताई, गीता प्रवचने, मधुकर विचार पोथी, स्त्री स्थितप्रज्ञदर्शन, कुरानुसार, स्वराज्य शास्त्र, साम्यसूत्रे जीवनसृष्टी

⚜️ महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी असे विनोबाजींना समजले जाते.

⚜️ निधन 15 नोव्हेंबर 1982

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


No comments:

Post a Comment