SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, September 10, 2022

निबंध ~ पावसाळ्यातील निसर्ग

 ⚜️  पावसाळ्यातील निसर्ग ⚜️




            उन्हाळ्यातील उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी जणू निसर्गाने पावसाळ्याची निर्मिती केली आहे. पहिल्याच पावसाच्या सरीने धरती माता प्रफुल्लित होऊन तिच्यातून सुगंध दरवळू लागतो. उन्हाळ्यात ठणठणीत असलेल्या नद्या, नाले, तलाव पावसामुळे हळूहळू तृप्त होऊ लागतात. कोमेजून गेलेल्या झाडांना नवचैतन्य प्राप्त होते.

              पावसाळ्यात 'जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे' असतात. ओबडधोबड झालेले डोंगर हिरवा शालू पांघरून नवरूप धारण करून जणू बसतात. पशुपक्षी, झाडे, वेली यांच्यात उत्साह, आनंद आणि नवचैतन्य भरणारा ऋतू म्हणजे पावसाळा. पाऊस धारा झेलत जाणारे पक्षी, पावसात आनंदाने नाहून जाणारी झाडे, चिंब भिजवून येण्यासाठी आईकडे परवानगी मागणारी चिमुकली मुले, डोंगर माथ्यावर निवांतपणे चालणारी जनावरे हे सारे दृश्य पाहून मन हरकून जाते. आनंदी ऋतू म्हणजे पावसाळा असे वाटते.

             बळीराजाला पावसाचा ऋतू तर वरदानच ठरतो तोही पावसाच्या आगमनाने आणि त्याच्या सातत्यपूर्ण सहवासाने सुखावतो उन्हाळ्यात पाऊस पडलेली काळी राणी पावसाळ्यात विविध पिकांच्या रूपाने अनेक लेकरांना आपल्या मांडीवर खेळवत असते. पावसाळ्यातील निसर्ग मनाला आनंद देणारा, सुखावणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा असतो. म्हणूनच पावसाळा हा ऋतू सर्वांना फार फार आवडतो.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

No comments:

Post a Comment